मनसे नवी मुंबई अध्यक्षाचा राजीनामा, जाधव-पानसेंवर आगपाखड, ‘कृष्णकुंज’वर कार्यकर्ते भिडले

| Updated on: Dec 14, 2019 | 1:29 PM

मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या मनमानीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मनसे नवी मुंबई अध्यक्षाचा राजीनामा, जाधव-पानसेंवर आगपाखड, कृष्णकुंजवर कार्यकर्ते भिडले
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता पक्षाला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण लागल्याचं दिसत आहे. मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांच्या मनमानीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा (MNS Gajanan Kale Resigns) दिला. त्यानंतर ‘कृष्णकुंज’वर काळे आणि जाधव यांचे समर्थक आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं.

अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचा स्पष्ट आरोप गजानन काळे यांनी ट्विटरवरुन केला होता. गजानन काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील आणि गजाजन काळे यांच्यासोबत राज ठाकरेंनी बैठक घेतली. यावेळी ‘कृष्णकुंज’वर गजानन काळे आणि अविनाश जाधव यांचे समर्थक एकमेकांना भिडले.

येत्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच गजानन काळे यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करण्यास तयार : आशिष शेलार

‘नवी मुंबईत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. सलग दोन-तीन निवडणुका न लढताही विधानसभा निवडणुकीत 50 हजार मतदारांचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो. परंतु काही पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तर काही जणांनी अमित ठाकरे यांच्या मोर्चाच्या एक दिवस आधी आपले राजीनामे दिले. या राजीनाम्यांमागे त्यांचा मोर्चा अयशस्वी व्हावा की काय अशी शंकाही यातून निर्माण होत असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात काम करणं मला अशक्य आहे. परंतु एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी कायम राहणार आहे. आपल्या नेतृत्वावर कायम विश्वास आणि प्रेम असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचारही मनाला शिवलेला नाही, असं काळेंनी (MNS Gajanan Kale Resigns) स्पष्ट केलं.