मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. रवी राणा यांनी गुरुवारी सांगितल्याप्रमाणे ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार इथल्या आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे. तसंच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलंही काम करु नका, असं आवाहनही पोलिसांनी राणा दाम्पत्याला केलं आहे.
हनुमान जयंतीला सर्वच राजकीय पक्षांकडून विविध शहरात हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचं पठण केलं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करावं. मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण होत नसेल तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असं आव्हान राणा दाम्पत्यानं दिलंय. तसंच आपण शुक्रवारी मुंबईत मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असंही रवी राणा यांनी काल जाहीर केलं होतं. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत.
राणा दाम्पत्याने आव्हान दिल्यानंतर आज मातोश्रीबाहेर शेकडो शिवसैनिक जमा झाले आहेत. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे देखील मातोश्रीबाहेर आले आहेत. शिवसैनिकांकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय. तसंच मुंबईत आलाच आहात तर मातोश्रीबाहेर येऊन दाखवा, असं आव्हानही शिवसैनिकांकडून देण्यात येत आहे. तर मातोश्रीबाहेर महाप्रसाद तयार आहे, राणा दाम्पत्यानं येऊन त्याचा लाभ घ्याला, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय.
इतर बातम्या :