मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) अटक प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे.आता संसदीय समितीने (Parliament) राणांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणात 15 जूनला राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र DGP रजनीश सेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे (Police Commissioner Sanjay Pande) यांना दिल्लीत हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांनाही दिल्लीला येण्याचा आदेश दिले आहेत. हेच नाही तर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना 15 जूनला हजर राहावे लागणार आहे. 15 जूनला दुपारी साडेबारा वाजता संसदीय समिती समोर ही सुनावणी होणार आहे. नवनीत राणा यांनी आपल्याला जेलमध्ये योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात नवनीत राणा अटक प्रकरण गाजत होतं.
सुरुवातील नवनीत राणा यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांना योग्य वागणूक पोलीस स्थानकात मिळाली नाही. आपण मागासवर्गीय जातीचे आहेत, म्हणून पोलिसांनी मला योग्य वागणूक दिली नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत बसले असल्याचा व्हिडिओच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोस्ट केला. मात्र हा व्हिडिओ सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील नसून हा हा व्हिडिओ खार पोलीस ठाण्यातील असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतरही राणांनी अनेक गंभीर आरोप केले.
खासदार नवनीत राणा या जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना मानचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच पोलिसांनी हे माहिती असूनही राणा यांना तुरुंगात योग्य वागणूक दिली नाही. आर्थड रोड जेल प्रशासनाने मुद्दाम राणा यांना फरशीवर बसण्यास आणि झोपण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचा हा त्रास जास्तच बळावाल. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती करुनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर एका महिला खासदाराला अशी वागणूक देणे योग्य नाही म्हणत भाजपने राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका केली. तसेच अनेक भाजप नेत्यांनी जाऊन राणा दाम्पत्याची भेटही घेतली. हे प्रकरण आता दिल्लीतल्या संसदीय समितीपुढे पोहोचले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना हे प्रकरण आता भोवणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.