मुंबई : अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात धक्कादायक खुलासा केलाय. मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात मलिक हे सध्या कोठडीत आहेत. आज मुंबई सत्र न्यायालयात बोलताना जे.जे. रुग्णालयात भरती करताना योग्य वागणूक मिळाली नाही. पाण्याची बॉटल देतानाही हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. इतकंच नाही तर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने जेजे रुग्णालयातील डॉक्टरांकडून आपला डिस्चार्ज करुन घेतला. रुग्णालयात सलाईन सुरु असताना कुठलीच पुर्वसूचना न देता अचानकपणे सलाईन काढण्यात आलं. डिस्चार्ज पेपरवरही सही घेण्यात आली, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय.
मुंबई सत्र न्यायालयात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. ईडीकडून मलिकांना अद्याप आरोपपत्राची प्रत देण्यात आलेली नाही, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसंच मलिकांनी केलेल्या आरोपांबाबत न्यायालयाने ईडीला योग्य निर्देश देण्याची विनंती नवाब मलिकांच्या वकिलांनी आज केलीय.
गेल्या अनेक दिवसांपासून मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली नाही आणि दुसरीकडे पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली. त्यामुळे मलिकांचा पाय आणखी खोलता गेला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती, मात्र त्या ठिकाणीही त्यांची निराशा झाली आहे. ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला आणि मलिकांसमोरचा तो पर्यायही संपला. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचे कारण देत त्यांच्या वकिलांकडून जामीन मागण्यात आला मात्र त्यालाही ईडीने विरोध केला.
एकीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जेल प्रशासनाकडून अयोग्य वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर नवनीत राणांना मानेचा त्रास जाणवू लागल्यानंतर प्रशासनाला कळवण्यात आलं होतं. मात्र, तरीही त्यांना वेळेत उपचार देण्यात आले नाहीत, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.