मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. कारण, दाऊत इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात 8 दिवसांची अर्थात 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केलाय.
अतिशय चुकीचा पायंडा पाडला जात आहे. त्यांना कुठल्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही. तर टेरर फंडिंग संबंधित गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने एफआयआर केलाय, ईडीने मनी लॉन्ड्रिंगमध्ये अटक केलीय. अशा परिस्थितीत एक मंत्री राजीनामा देणार नसतील आणि सरकार म्हणत असेल की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही, तर एक संविधानिक परिस्थिती या ठिकाणी तयार होते. पण मी त्यावर बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की देशात याचा चुकीचा संदेश जाईल. दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहत असल्याचा संदेश यातून जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केलीय.
नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. एक तर आहेत. एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला. एका नेत्याचं अनधिकृत रिसॉर्ट आहे. एका मंत्र्याला दोन पत्नी आहे. किती मोठी यादी आहे. हे काय चाललं आहे? सगळं कोलमडलं आहे, अशी टीका पाटील यांनी केलीय.
दरम्यान, मलिकांच्या राजीनाम्याबाबत भुजबळ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. ‘राजीनामा देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यांच्यावर गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंनाही अटक झाली होती, मग त्यांना राजीनामा मागितला गेला होता का? ते दोषी आहेत म्हणून न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही तोवर राजीनाम्याचा प्रश्न नाही. आमच्या दृष्टीने त्यांनी चूक केलेली नाही. दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची शिक्षा आम्ही तरी त्यांना देणार नाहीत. अनिल देशमुख, राठोड यांच्याबाबत जे झालं ते आता होणार नाही. राजीनाम्याचा आसूरी आनंद आम्ही भाजपला होऊ देणार नाही, असं भुजबळ म्हणाले.
इतर बातम्या :