अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक

| Updated on: Jan 28, 2020 | 12:14 PM

सत्तेत जाण्याआधी संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचं शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा दावा अशोक चव्हाणांनी काल केला होता

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे. सरकार स्थापन करताना आम्ही शिवसेनेकडून काहीही लिहून घेतलेलं नाही, असं स्पष्टीकरण अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Ashok Chavan) दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही सह्या आहेत, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. सत्तेत जाण्याआधी संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचं शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा दावा अशोक चव्हाणांनी काल केला होता, त्यानंतर मलिक यांनी अशोक चव्हाणांना उत्तर दिलं.

घटनेच्या चौकटीत राहून सरकार काम करेल, असं लेखी आश्वासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेकडून मागितलं होतं. जे सरकार स्थापन होईल ते घटनेच्या चौकटीत काम करेल, असं आश्वासन शिवसेनेकडून घेण्यास त्यांनी सांगितल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. आपण तीन पक्षाच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबद्दल बोललो, हा कार्यक्रम संविधानाला अनुसरुन तयार केलेला आहे. त्याप्रमाणे सरकारचं काम चाललं पाहिजं, अशी आपली भूमिका असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं.

भुजबळांकडून दुजोरा

अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिला होता. “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत होती, तेव्हा वेळ लागणार होता. त्यावेळेस तुम्ही सगळे तक्रार करत होतात. तसेच, लोकशाही मार्गाने सर्व काही झालं पाहिजे असं मत होतं, हे शिवसेनेनं मान्य केलं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

शब्दशः अर्थ नको

“अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी विषयी केलेल्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. त्यामुळे विचारानेच बांधले गेलो आहोत”, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले होते.

“असं कुणी लिहून घेत नसतं. अशोक चव्हाण सहज बोलले असतील. हे सरकार पाच वर्षे टिकावं, अशी शिवसेनेसह सर्वांची इच्छा आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल”, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला होता.


Nawab Malik on Ashok Chavan