सारखं-सारखं काय विचारता? मुख्यमंत्री शिवसेनेचाच : नवाब मलिक

| Updated on: Nov 15, 2019 | 11:17 AM

मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? हा प्रश्न सारखा-सारखा का विचारला जातो, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारलं

सारखं-सारखं काय विचारता? मुख्यमंत्री शिवसेनेचाच : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेनेच्या मुख्यमंत्रिपदाचा पुनरुच्चार केला आहे. महासेनाआघाडी सरकार सत्तेत येणं आता जवळपास निश्चित मानलं जात (Nawab Malik on Government formation) आहे.

‘सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार. शिवसेनेला अपमानित करण्यात आलं होतं. त्यांचा स्वाभिमान कायम राखणं ही आमची जबाबदारी आहे’ असं नवाब मलिक ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जाहीर!

कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार, तसंच किमान समान कार्यक्रम काय यावर वाटाघाटी सुरु आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रिपदावर केलेलं भाष्य मोठं मानलं जातं. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल असं नवाब मलिक यांनी कालही ‘टीव्ही 9’ ला सांगितलं होतं.

“मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करु” असं नवाब मलिक म्हणाले होते.

पर्यायी सरकारशिवाय पर्याय नाही

पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं नवाब मलिक चार दिवसांपूर्वी (Nawab Malik on Government formation) म्हणाले होते.

समन्वयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची समिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र भाजप वगळता उर्वरीत तीन पक्ष आता एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत जाहीर केलं होतं. आता तीनही पक्ष किमान सामायिक कार्यक्रम धोरण आखत असून, एकमेकांशी चर्चेच्या वाटाघाटी सुरु आहेत.