मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारात त्यांना ईडीने (ED)अटक केली आहे. आज नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. कारण नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला आहे. नवाब मलिक (Nawab Malik custody) यांना 7 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावरून अधिवशनातही मोठा पॉलिटिकल राडा झाल्याचे दिसून आले. एखादा मंत्री जेलमध्ये आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. मंत्र्यांवरील आरोप साधासुधा नाही. रिमांड आर्डरमध्ये ही केस कशी आहे, हे लिहिलं गेलं आहे. मुंबई बाँब स्फोटाच्या आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची. ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीची जमीन मालकाला एक पैसा द्यायचा नाही. त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसिना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे. हे पैसे कुठे वापरले गेले, असा सवाल करत मुंबई बाँबस्फोटाकरिता हा पैसा वापरला गेला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.
मलिकांविरोधात विरोधकांची घोषणाबाजी
मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक हाय हाय… दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते उपस्थित होते. भाजप नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर देवेंद्र फडणवीसदेखील सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळी केली.
मलिक दाऊदचे दलाल-भाजप
दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून जमीनी विकत घेण्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा देशद्रोह असल्याची टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. यावरून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्य सरकारचं कोर्टात ‘त त प प’! हा तर ओबीसींना धोका द्यायचा कार्यक्रम, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात