रायगड : “आंबेत ग्रामपंचायत आणि श्रीवर्धन मतदार सघांचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. यांच्या विकासासाठी जो मदत करेल त्याला आमची साथ असेल”, असं माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांनी म्हटलं. नविद अंतुले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश देसाई हे दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नविद अंतुले आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनंत गिते यांच्या वाढत्या भेटींमुळे ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंबेत ग्रामपंचायत आणि श्रीवर्धन मतदारसघांच्या विकासासाठी जो मदत करेल, त्याला आमची साथ असेल, असे नविद अंतुले यांनी सांगितलं. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेत ग्रामपचांय आणि श्रीवर्धन मतदारसघांचा विकास रखडलेला होता. मात्र, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंबेत ग्रामपचांयतच्या विकासाकरिता निधी दिला. त्यामुळे नविद अंतुले यांनी अनंत गीतेंना खुलं समर्थन दर्शवलं आहे. त्यासोबतच, “जो कुणी श्रीवर्धन विभागाचा विकास करेल त्याच्याकडे आम्ही अनेकवेळा जाऊ”. ग्रामपंचायत विकासाकरिता गीते साहेबांकडे येणं-जाणं वाढल्यानेच शिवसेना प्रवेशाच्या बातम्या आल्याचंही नविद अंतुले यांनी स्पष्ट केलं.
माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले हे राजकारणात फारसे सक्रीय नसले, तरी बॅ. ए. आर. अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे अंतुले कुटुंबाची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे नविद अंतुले हे शिवसेनेत गेल्यास राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं.
दुसरीकडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, प्रकाश देसाई आता स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश देसाई यांचीही राजकीय ताकद प्रभावी आहे. त्यामुळे प्रकाश देसाई हे राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडल्यास तटकरेंना फटका बसू शकतो.