राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हल्ली खूपच भावूक झाले आहेत. त्यांनी महायुतीत आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अजितदादांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. परंतू त्यानंतर सारे श्रेय नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन गेले आहेत. आता अजित पवार यांनी आपण आपल्या पत्नीला आपल्या बहिणीच्या विरोधात लोकसभेत उभारायला नको होते अशी खंत बोलून दाखविली आहे.त्यातच आता अजितदादा यांच्या गटाचे आमदार शेखर निकम यांचा मुलगा अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलियातून येताच शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वरओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अजितदादा यांच्या गटाचे आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध यांनी ऑस्ट्रेलिया येथून हॉर्टिकल्चरमध्ये पदव्युतर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वरओक या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे जुलै 2022 रोजी ऑस्ट्रेलियाला शिकायला जाताना देखील त्यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते.
दोन वर्षातील ऑस्ट्रेलियातील शैक्षणिक अनुभव आणि ऑस्ट्रेलिया कृषी विभागासोबत केलेल्या कामांची शरद पवार यांनी अनिरुद्ध निकम यांच्याकडून माहिती घेतली. तसेच भविष्यात काय करणार याचीही चर्चा करुन अनिरुद्ध यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार गोविंदराव निकम यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. खासदार गोविंदराव निकम यांच्यासोबत खासदार असताना एकत्रित केलेल्या कामांची पवार यांनी चर्चा केली. खासदार गोविंदराव निकम यांचे कोकणासाठी असलेल्या योगदान याची आठवण करून शिक्षण, सहकार, राजकारणात एकत्रित काम केलेल्याच्या आठवणी पवार साहेबांनी सांगितल्या. शरद पवार यांनी आमदार शेखर निकम यांची आपुलकीने चौकशी करून सर्व कुटुंबियांची आणि त्यांच्या संस्थेची कामे जाणून घेतली. या भेटीने राजकारणात नवीन चर्चा सुरु झाली आहे.