महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. यामुळे सध्या सर्वच पक्षांकडून आमदारांची चाचपणी सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या गेल्या काही दिवसांपासून जळगावात आहेत. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा जळगावात मेळावा पार पडत आहेत. नुकतंच रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जळगावातील पारोळा काल महिलांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षाही रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केली.
“विधानसभा निवडणुकांसाठी अद्याप अवकाश आहे, मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण? याबद्दल सध्या चर्चा सुरु आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. प्रत्येकाला आपला नेता मोठा व्हावा, असं कार्यकर्ता म्हणून वाटत असते. त्यामुळे आमचा नेता मोठा व्हावा, अशी कार्यकर्ता म्हणून आमचीही इच्छा आहे. त्यामुळे आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची अपेक्षा आहे”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
मी जिल्हा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जरी फिरत असले, तरी महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. विधानसभेमध्ये आमचे महायुतीचे जे उमेदवार असतील किंवा त्यांच्या मित्र पक्षांचे कोणी उमेदवार असतील, त्यांच्यासाठी आम्ही सर्व एकत्रित काम करणार आहोत. विरोधक लोकांकडे घेऊन जाण्यासारख्या कुठल्याही योजना नाही, त्यामुळेच टीका करण्याचा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पण टीका करणाऱ्यांनी टीका करावी, त्यांचा तो एकच उपक्रम आहे. त्यात आम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले.
दरम्यान अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तर काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. अजित पवारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला होता.