Ajit Pawar On Controversial statement : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील वाद शिगेला पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेते वारंवार अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने सुरु आहेत. त्यामुळेच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून महायुतीच्या नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात सातत्यांनी त्यांची चर्चा सुरु आहे. त्यातच महायुतीतील नेते धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यही करत आहेत. हिंदू-मुस्लिम समाजाबद्दल केलेले धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे महायुतीचे नेते चर्चेत आले आहेत. ही वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट तसेच भाजप आमदार नितेश राणे, खासदार अनिल बोंडे यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
यावरुनच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाचे काही नेते हे धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करणाऱ्या शिंदे गट आणि भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करणार आहेत. काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे विरोधकांकडून सातत्याने महायुतीची बदनामी होत आहे. यामुळे नागरिकांकडूनही संताप होत आहे. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार गट थेट दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते दिल्लीत जाऊन महायुतीतील काही नेत्यांची तक्रार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजित पवार गटाकडून सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे या तक्रारीतून अजित पवार हे आपण अजूनही मुस्लीम मतदारांच्या पाठीशी उभे आहोत, असा संदेशही देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त विधानाबद्दल अजित पवार दिल्लीत काय तक्रार करणार, याची मला माहिती नाही. अजितदादा यांना ते काय तक्रार करणार याबद्दल विचारायला हवं. त्यांनी तक्रार केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी काय म्हटलं, हे पण त्यांना विचारा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.