दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादीतील फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांनी भेटायला गेले आहे. विशेष म्हणजे उद्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या भेटीत राष्ट्रवादी का सोडावी लागली याची माहिती देतानाच शरद पवार यांचा सल्लाही राष्ट्रवादीचे मंत्री घेतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शरद पवार काय सल्ला देणार याकडे सर्वांचं लक्षा लगालं आहे.
दरम्यान, या मंत्र्यांसोबत अजित पवारही आले आहेत. अजितदादा दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार हे परवाच शरद पवार यांच्या घरी गेले होते. त्यांची काकू प्रतिभा पवार या आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गेले होते. अजितदादानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्रीही शरद पवार यांना भेटायला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चव्हाण सेंटरकडे जायला निघाले आहेत. चव्हाण सेंटरला कोण आलंय हे माहीत नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन होता. त्यामुळे मी वायबी चव्हाण सेंटरकडे जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मात्र, त्यांनी या भेटीवर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत.