मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची जागावाटपाची चर्चाच अजून सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता दोन जागांवर राजी केलं जाण्याची शक्यता आहे. खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ, तर वर्धा, सांगली, बुलडाणा यापैकी एक जागा दिली जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दोन जागांवर स्वभिमानी समाधान मानणार का याबाबत राजू शेट्टींचं म्हणणं अजून समजू शकलेलं नाही. कारण, नऊ ते दहा जागांसाठी स्वाभिमानी स्वबळावर तयारी करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आलेली नाही. हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, वर्धा, बुलडाणा, शिर्डी, परभणी आणि औरंगाबादमध्ये उमेदवार देऊ शकते, असंही बोललं जात होतं. पण आघाडीत दोन जागांवर राजू शेट्टी समाधानी असतील का हा प्रश्न आहे.
भारिप-आघाडीत चर्चांचं सत्र
भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याशीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चर्चा केली. पण भारिप 12 जागांवर ठाम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या इच्छुकांची गर्दी पाहता, आघाडीकडून 12 जागा सोडण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही आणि प्रकाश आंबेडकर एकही जागा कमी घेण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे भारिप आणि स्वाभिमानीला सोबत घेण्यासाठी आघाडीची दमछाक होणार हे निश्चित झालंय.
आघाडीत स्वाभिमानीचं महत्त्व काय?
गेल्या दोन टर्मपासून हातकणंगले हा राजू शेट्टींचा बालेकिल्ला बनलाय. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे उमेदवार निवडून आला नाही तरीही स्वाभिमानीची मतं विभागल्यामुळे एखादा उमेदवार मात्र नक्कीच पडू शकतो. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्वाभिमानीली सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय बुलडाण्यातून स्वाभिमानीचे रवीकांत तुपकर हे इच्छुक आहेत. राज्यातल्या काही ठराविक मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मतदारवर्ग आहे.