मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने काल पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करुन लढणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा येतात. त्यातील 10 जागा काल, तर 5 जागा जाहीर करण्यात आल्या. विशेष म्हणजे, मावळमधून नातू पार्थ पवार यांची उमेदवारी स्वत: शरद पवार यांनीच जाहीर केली. तसेच, दुसऱ्या यादीतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरुरमधून विलास लांडे यांचा पत्ता कट झाला आहे.
राष्ट्रवादीकडून बीड लोकसभेसाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. त्यांच्या नावावर एकमत झाल्याचीही माहिती होती. पण ऐनवेळी निर्णय बदलत नवखा उमेदवार देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा करण्यात आली.
भाजपकडून अजून अधिकृतपणे उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. पण बीडसाठी डॉ. प्रितम मुंडे याच पुन्हा उमेदवार असतील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यामुळे देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या डॉ. प्रितम मुंडेंविरुद्ध राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे.
कोण आहेत बजरंग सोनवणे?
बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातून, तर यांच्या पत्नी सारीकाताई सोनवणे या युसुफवडगाव गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. या पूर्वी बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषविले असून त्या काळात त्यांनी शिक्षण आणि शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देणे आणि गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न याची राज्यस्तरावर चर्चा झाली होती.
बजरंग सोनवणे यांचे सहकार क्षेत्रातही चांगले कार्य असून खरेदी विक्री संघही त्यांच्या ताब्यात आहेत. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते चालवित असलेला येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. बजरंग सोनवणे हे जॉईंट किलर म्हणून ओळखले जात असून विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.
जाती-पातीच्या राजकारणात अल्पसंख्यांक, दलित-मुस्लीम समाजाचे मतदान घेण्यात ते यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्यांना केज-अंबाजोगाई आणि जिल्ह्यात मराठा समाजचा आणि तळागाळातून आलेले आणि एक सामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून पाहिले जाते. तसेच बजरंग सोनवणे यांची सामान्य गोरगरीब, कष्टकरी यांच्याशी नाळ जोडलेली आहे. अत्यंत महत्त्वकांक्षी आणि आलेली संधी ही आव्हान समजून संघर्ष करणे ही त्यांची खासियत आहे.
राष्ट्रवादीची पहिली यादी
राष्ट्रवादीची दुसरी यादी