सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Karmala Ajit Pawar) यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार असतानाही अपक्षाला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे संतापलेल्या अधिकृत उमेदवाराने अजित पवारांना (Karmala Ajit Pawar) इशारा दिला आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असताना अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करणं हे अजित पवारांचे दुर्दैवी वक्तव्य आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही, उलट शेतकरीच अजित पवारांना काय हिसका असतो ते दाखवून देतील, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील (Karmala Sanjay Patil) यांनी दिली.
अजित पवार यांनी वेळापूर येथे करमाळयात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला. सर्वसामान्य जनतेचं प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळणार असतानाही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदाराचा प्रचार न करता अपक्षाला पाठिंबा जाहीर केला. तरी मी पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या विचारानुसार निवडणूक लढवणार असल्याचंही संजय पाटील यानी सांगितलं.
करमाळ्यात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड घोळ समोर आलाय. कारण, पक्षाचा अधिकृत उमेदवार असूनही प्रमुख नेत्यानेच अपक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. संजय मामा शिंदे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीतही संजय मामा शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली होती. आता अजित पवारांनी संजय मामा शिंदे यांच्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच विरोध केला आहे.
करमाळ्याची लढत रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालंय. कारण, महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. शिवसेनेने विद्यमान आमदाराचा पत्ता कट करुन राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यातच राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराच्या ऐवजी अजित पवारांनी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिल्याने मोठा घोळ निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या :