शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानंही नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं? दुसरा विधानसभा अध्यक्ष…

| Updated on: Feb 10, 2023 | 11:53 AM

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन घटकपक्षांपैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं काँग्रेसच्या अंतर्गत वादावर आता जवळपास भूमिका स्पष्ट केल्याचं दिसून येतंय.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानंही नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं? दुसरा विधानसभा अध्यक्ष...
Image Credit source: social media
Follow us on

चंदन पूजाधिकारी, नाशिकः  काँग्रेसच्या अंतर्गत वादात शिवसेनेने थेट भूमिका जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे.महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यानंतर इतर पेच निर्माण झाले आणि सरकार कोसळलं, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

काय म्हणाले छगन भुजबळ?

काँग्रेसमधील अंतर्गत वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच उघड भाष्य केलंय. ते म्हणाले, ‘ नाना पटोले यांनीही विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतलं नाही. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकला नाही. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

थोरात-पटोले वाद काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस होती. नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत हा वाद जास्त उफाळून आला. येथील सत्यजित तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित तांबेंना नाना पटोले यांनी काँग्रेसचे तिकिट मुद्दामहून नाकारले, असा आरोप तांबे-थोरात कुटुंबियांनी केलाय. तसेच या निवडणुकीत पटोलेंनी प्रचंड राजकारण केल्याचा आरोप थोरात यांनी केलाय. बाळासाहेब थोरातांनी महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. हे प्रकरण आता दिल्ली दरबारी आहे.

शिवसेना पटोलेंविरोधात?

थोरात-पटोले वादात शिवसेनेनं बाळासाहेब थोरात यांची बाजू घेतली आहे. बाळासाहेब थोरात हे अनुभवी नेते आहेत. पटोले यांनी हा वाद मिटवावा. त्यांनी मविआ सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाच नसता, तर उद्धव सरकार कोसळलं नसतं, अशा शब्दात शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन घटकपक्षांपैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं काँग्रेसच्या अंतर्गत वादावर आता जवळपास भूमिका स्पष्ट केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नाना पटोले विरोधात बाळासाहेब थोरात या वादात पटोलेंविरोधात बहुतांश नेते असल्याचं चित्र आहे.

वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांचा घरचा आहेर

तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाना पटोले यांना घरचा आहेर दिला आहे. पटोलेंसारखा सक्षम नेते विधानसभा अध्यक्ष पदावर होते. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे पुढील पेच उद्भवला, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
यशोमती ठाकूर यांनीही यास सहमती दर्शवली. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकलं असतं, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी काल केलंय.