बारामती: अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिश्किल शैलीत समाचार घेतला. (Sharad Pawar slams Narayan Rane)
ते रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह रविवारी कोकणात येणार आहेत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
मात्र, देवेंद्र फडणवीस वगळता भाजपचे अन्य नेते हेलिकॉप्टरने थेट कणकवलीमध्ये दाखल होणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे कणकवली हेलिपॅडवर येणार नाहीत. ते अमित शाह यांच्याबरोबर येणार आहेत. त्यामुळे आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीत काही नवा प्लॅन शिजणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
एकीकडे नारायण राणे महाविकासआघाडीचे सरकार पडेल, असे भाकीत करत असताना काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह हे मात्र राणेंच्या कार्यक्रमासाठी कणकवलीत गेले आहेत. विशेष म्हणजे कृपाशंकर सिंह यांचे स्वागत करण्यासाठी नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे कणकवलीत उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, कृपाशंकर सिंह यांनी माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, असे म्हटले आहे.
नारायण राणे आणि माझे कौटुंबिक संबंध असल्याने मी या कार्यक्रमाला आलो आहे. यामागे कोणतीही राजकीय समीकरणं नाहीत, असे कृपाशंकर सिंह यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या:
राणे अमित शहांना उद्घाटनासाठी भेटले, त्यावेळेस शहा नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेच्या वर्चस्वाला हादरा, पक्षश्रेष्ठी राणेंवर खुश; अमित शाह कोकणात येतलेत
(Sharad Pawar slams Narayan Rane)