मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला आपण योग्य न्याय देऊ, तसेच शिवसेना-भाजप युती एकसंध ठेवण्याचा आपला कायम प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळातही चंद्रकांत पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. येत्या विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आणि इतर मुद्दे महत्त्वाचे ठरणार असल्याचे संकेत या नियुक्तीमधून मिळाले आहेत.
राज्यात सध्या भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष आहेत. या सर्व पक्षांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मराठा समाजाच्या चेहऱ्याकडे पक्षाचं नेतृत्त्व देणं पसंत केलंय. राज्यातील मराठा मतदारांचा टक्का पाहता जातीय समीकरणं जुळवण्यास सुरु झाल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे. कारण, काँग्रेसनेही नुकतीच प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली आहे.
तीन पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मराठा समाजाचे
राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्यावर जबाबदारी दिली. मराठा आरक्षण आंदोलन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आघाडी सरकारच्या काळात दिलेलं आरक्षण कोर्टासमोर टिकलं नव्हतं. हा मुद्दा विद्यमान सरकारने लोकांसमोर आणला. पण या सर्व मुद्द्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा मराठा चेहऱ्यावर राज्याची जबाबदारी दिली. ही विधानसभा निवडणूक काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्त्वात लढवणार असल्याचा अंदाज लावला जात होता. पण अखेर बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने काँग्रेसचं राज्यातील नेतृत्त्वही मराठा नेत्याकडे देण्यात आलं. बाळासाहेब थोरात यांनी सूत्र हाती घेताच आगामी निवडणुकीत जातीय समीकरणं जुळवण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. उच्चस्तरीय मंत्रीगटाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच देण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक असो किंवा इतर मागण्या, चंद्रकांत पाटलांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता. या विधानसभेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी चंद्रकांत पाटलांकडे देण्यात आली आहे. शिवाय भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे निकटवर्तीय अशी चंद्रकांत पाटलांची ओळख आहे. त्यामुळे आगामी समीकरणं लक्षात घेत चंद्रकांत पाटलांकडे ही जबाबदारी दिल्याचं बोललं जातंय.