मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर रात्री बाराच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर हल्ला करुन, हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्थानिकांनी मोहसिन शेख यांना झेन रुग्णालयात दाखल केलं. रात्री बाराच्या सुमारास हा थरार रंगला.
या हल्ल्याची बातमी कळताच ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. पाटील यांनी मोहसिन शेख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी हा हल्ला राजकीय हेतूने झाल्याचा दावा केला आहे.
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरण आणखी वाढू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
हा हल्ला नेमका का झाला? कोणी केला? त्याच्या मागची काय कारणं आहेत, या सगळ्यांचा तपास आता पोलीस करत आहेत. पण निवडणुकीच्या काळामध्ये हा हल्ला झाल्याने त्याला नक्कीच राजकीय वळण मिळालं आहे.