मुंबई : भाजपकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकावर एक धक्के देणं सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. दिंडोरीमधून उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार या उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत ऐनवेळी दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
अगोदर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे, त्यानंतर विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील आणि आता भारती पवार भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. रणजित सिंह मोहिते पाटीलही उद्याच भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलंय.
कोण आहेत भारती पवार?
दिंडोरी हा राष्ट्रवादीसाठी बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचा येवला आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ दिंडोरीतच येतो. भारती पवार या दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. त्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान प्रदेश उपाध्यक्षा आहेत.
दिंडोरीतून हरीश्चंद्र चव्हाण हे सध्या भाजपचे खासदार आहेत. पण त्यांच्यावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याने पक्ष दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळेच भारती पवार यांना तिकीट दिलं जाऊ शकतं. माकपकडून जे. पी. गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यामुळे इथे माकपचीही ताकद आहे.
लोकसभा 2014 मध्ये प्रथम मताची आकडेवारी
हरीश्चंद्र चव्हाण -भाजप – 5 लाख 42 हजार मते
भारती पवार – राष्ट्रवादी काँग्रेस -2 लाख 97 हजार मते
वाघेरे – माकप – 73 हजार
दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघ
दिंडोरी- नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी
निफाड – अनिल कदम, शिवसेना
येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
नांदगाव – पंकज भुजबळ, राष्ट्रवादी
कळवण – जे.पी गावित, माकप
चांदवड – राहुल आहेर, भाजप