रत्नागिरी : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्याची कबुली दिली आहे. कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
‘होय, माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं आमंत्रण मला दिलं आहे. मात्र याविषयी कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे.’ असं भास्कर जाधवांनी स्पष्ट केलं. जाधव यांनी प्रस्ताव मान्य केल्यास 15 वर्षांनी शिवसेनेत त्यांची घरवापसी होईल.
सुरुवातीला, ‘आपण कोणाचीही भेट घेतलेली नाही, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत’, असा दावा करणाऱ्या भास्कर जाधवांनी अखेर शिवसेनेचा भगवा पुन्हा हाती धरण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीला पडलेलं खिंडार आणखीनच रुंदावण्याची चिन्हं आहेत.
शिवसेनेतून सुरुवात
1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. 1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवली. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.
2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.
आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आलं. भास्कर जाधव यांनी शिवसेनेची वाट धरल्यास राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल.
शिवसेनेचं ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’
लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या गोटात गेलेले धनराज महाले (Dhanraj Mahale) शिवसेनेत परतले. तर बहुजन विकास आघाडीचे बोईसरमधील आमदार विलास तरे (Vilas Tare) यांनीही पुन्हा शिवबंधन बांधलं. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनीही घरवापसी केली आहे.
भास्कर जाधव यांनीही राष्ट्रवादीतून शिवसेनेत परतण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. तर छगन भुजबळही शिवसेनेत पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी, खासदार सुनिल तटकरेही राष्ट्रवादीचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात होतं.
राष्ट्रवादीला खिंडार, युतीमध्ये इनकमिंग
राष्ट्रवादी ते भाजप : शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik), राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh), राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीला रामराम : रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.
काँग्रेस ते युती : काँग्रेसमध्ये असलेले सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी भाजपची वाट धरली. काँग्रेसकडून नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजप, तर कन्या आणि काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.