उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करत भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 17 बंडखोर जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाने दणका दिला आहे (Osmanabad ZP Elections). राष्ट्रवादीच्या 17 बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 17 जानेवारीला होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडीचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे (NCP Osmanabad ZP Members).
राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. विद्यमान अध्यक्षा अस्मिता कांबळेसह माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी उपाध्यक्ष तथा भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा समावेश आहे. राणा पाटील समर्थक बंडखोर सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. जिल्हा परिषदेत बंडखोर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार तानाजी सावंत गटाच्या सदस्यांच्या मदतीने भाजपची सत्ता आली आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचलले असतानाच शिवसेनेनेही 8 बंडखोर सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा शिवसेनेने सदस्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडी विरोधात जाणाऱ्या सदस्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली असली, तरी त्यामुळे सत्तापरिवर्तनात कितपत यश येते हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.