बीड : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडसाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये आता अंतर्गत वाद जाहीरपणे दिसू लागला आहे. बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडे यांची मोठी कसरत सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकिशोर मुंदडा हे नाराज असल्याचं उघड झालंय. केज येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी पाठ फिरवली असल्याने धनंजय मुंडेंच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे हे मात्र निश्चित.
नंदकिशोर मुंदडा आणि बजरंग सोनवणे हे दोघे एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करायचे. मात्र काही कारणास्तव हे दोघेही विभक्त झाले. एवढेच नाही, तर बजरंग सोनवणे यांनी मुंदडा गटाच्या विरुद्ध काम केल्याने या दोघांतील दरी आणखी वाढत गेली. परळी येथे पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात मुंदडा गटाची नाराजी दूर करून त्यांना पुन्हा कार्यात सामावून घेण्यात आलं. पण नाराजी दूर करण्यासाठी दिलेली वचने पाळण्यात आलेली नसल्याने मुंदडा पुन्हा नाराज झाल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणूनच केज येथील कार्यकर्ता मेळाव्याला मुंदडा गटाने पाठ फिरवली.
अंबाजोगाई आणि केज परिसरात मुंदडा गटाचं मोठं वर्चस्व आहे. त्यांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नंदकिशोर मुंदडा गटाची समजूत काढणे हे धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे
गटातटाच्या राजकारणात राष्ट्रवादी बॅकफूटवर?
बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी गेवराईच्या अमरसिंह पंडित यांना देऊ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पंडितांनी देखील जय्यत तयारी केली होती. मात्र अचानक बजरंग सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने पंडित गट नाराज झाला. तशी त्यांची मनधरणी देखील झाली. परंतु पंडित समर्थक अद्याप नाराज असल्याचं दिसून येत आहे. आता मुंदडा गट नाराज झाल्याने राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. गटातटाच्या या नाराजीत राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यातून घरघर सुरू असल्याचं सध्यातरी चित्र आहे.
बीडमध्ये भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनाच उमेदवारी निश्चित आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या प्रितम मुंडे यांनी देशातून सर्वाधिक मताने निवडून येण्याचा विक्रम केला होता. एकीकडे भाजपची अजून यादी जाहीर झालेली नाही. तर धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणेंसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पण गटबाजीने राष्ट्रवादीला घरघर लागली आहे.