दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये कोणाचा समावेश?
उद्या म्हणजेच 17 जानेवारीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेवादीर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये 20 नावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.
असा असेल दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवाराला वीस जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
भाजप – आपमध्ये चूरस
याही विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत पुन्हा एकदा भाजप आणि आपमध्ये चूरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे, भाजप आणि आपमध्ये दिल्लीत काटे की टक्कर होऊ शकते. त्यामुळे भाजप अरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन सत्ता स्थापन करणार की, पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपचीच सत्ता येणार? हे पाहाणं महत्त्वांच ठरणार आहे. या निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्याचा देखील प्रभाव या निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे.