बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. मात्र मागील काही दिवसात नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणात कुरबुरीचे राजकारण सुरु आहे. सध्या बारामतीत विकासकामांपेक्षा पक्षाअंतर्गत चालणार्या कुरघोडींचीच चर्चा अधिक आहे. ही बाब राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गांभीर्याने घेत, शनिवारी बैठकीत पदाधिकारी आणि नगरसेवकांची चांगलीच झाडाझडती घेतली. बारामतीत एकहाती सत्ता असताना चालणार्या कुरबुरींबाबत पवारसाहेबही विचारणा करतात, त्यामुळे आता एकदिलाने काम करा, अशा शब्दात अजित पवारांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. अजित पवारांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. हा वाद अक्षरश: मुद्यांवरुन गुद्यांवर आल्याने अजित दादांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांना तंबी दिल्याची चर्चा आहे.
बारामती नगरपरिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह विरोधकांनी लक्ष्य केले. या सभेत नगराध्यक्ष अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. त्यांनीही आपली कैफियत अजित पवारांपुढे मांडत नगर परिषदेत सुरु असलेल्या कुरबुरींची माहिती दिली. सर्वसाधारण सभेपूर्वी आपण बैठक घेऊनही सभागृहात गोंधळ होतोच कसा, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करत नगरपरिषदेतील गटबाजीबाबत गांभीर्याने निर्णय घेण्याचा सूचक इशारा या बैठकीत दिला.
अंतर्गत कुरघोडीने अजित पवार संतापले
बारामती नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे अडीच कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव दाखल केले होते. मात्र रुईतील विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील एक कोटींचाच प्रस्ताव मंजूर झाल्याची बाब एका नगरसेवकांनी अजित पवार यांच्यापुढे मांडली. त्यावर अजित पवारांनी संबंधित नगरसेवकाला खडेबोल सुनावत, त्या प्रभागातील लोक आम्हाला विधानसभा, लोकसभेला मतदान करत नाही का? राष्ट्रवादीची एक नगरसेवकही त्याच प्रभागातून निवडून आलीय, मग तुझ्या का पोटात दुखतंय, अशी विचारणा करत संबंधित नगरसेवकाला खडेबोल सुनावले. एका नगरसेवकाने इशांत सिस्टीमच्या बिलांबाबतचा मुद्दा अजित पवारांपुढे मांडला. त्यावर दुसर्या नगरसेवकाने संबंधित कंपनीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याने अजित पवार चांगलेच संतापले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे नगरपरिषदेची फसवणूक केली जात असेल, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाच त्यांनी मुख्याधिकार्यांना दिल्या.
बारामती नगर परिषदेतील प्रशासनाकडून कसलेच सहकार्य होत नाही, मुख्याधिकारीही सुट्टीवर असतात अशाही तक्रारी यावेळी अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्या. तर प्रभागातील कामे घेऊन अनेक नागरिक येतात. मात्र प्रशासनाचे सहकार्य नसल्यामुळे नागरिकांची नाराजी पत्करावी लागत असल्याचंही अनेक नगरसेवकांनी सांगितलं. प्रशासनाला प्रश्न विचारला तर पदाधिकारी नाहक आपल्यावर ओढून घेतात अशी व्यथाही एकाने मांडली. शहरात नव्याने उभारण्यात येणार्या पाण्याच्या टाक्यांच्या जागांबाबत माहिती दिली जात नसल्याचं, तसेच तीन हत्ती चौक ते परकाळे बंगला या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम दोनदा काढून नगरपरिषदेच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचंही अजित पवार यांच्या यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं.
एकूणच अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेली बैठक पक्षांतर्गत गटबाजीमुळे चांगलीच गाजली. एकीकडे अजित पवार यांनी भाजप सरकारला परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून धारेवर धरत राज्यभर दौरे सुरु केले आहेत. राज्यभरात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना होम पिच असलेल्या बारामतीतच पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आल्याने अजित पवार याबाबत काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षा विश्वासात घेत नसल्याची तक्रार
बारामती नगरपरिषदेत 50 टक्के महिला नगरसेविका आहेत. तर नगराध्यक्षपदही महिलेकडेच आहे. मात्र विद्यमान नगराध्यक्षा नगरसेविकांनाही विश्वासात घेत नसल्याची तक्रार एका महिला नगरसेविकेने अजित पवार यांच्यासमोर केली. वास्तविक नगराध्यक्षपदी महिला विराजमान असताना महिला नगरसेविकांना विविध बाबींमध्ये सामावून घेऊन विकासकामे मार्गी लावली पाहिजेत. मात्र प्रत्यक्षात नगराध्यक्षांकडून नगरसेविकांनाही विश्वासात घेतले जात नसल्याने अनेक बाबींमध्ये कुचंबना होत असल्याची तक्रार या नगरसेविकेने केली.
अजित पवार यांच्यासमोरच दोन नगरसेवकांत जुंपली
गटबाजीवरुन अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी आणि नगरसेवकांना गटबाजीवरुन फैलावर घेतलेले असतानाच या बैठकीत दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद मुद्यांवरुन गुद्यांवर आल्याने अजित पवारही अवाक झाले. या प्रकारावरुन अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांना तंबी दिल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे, एकहाती सत्ता असताना पक्षांतर्गत गटबाजीमुळे बारामती नगरपरिषद सतत चर्चेत असते. त्यामुळे ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेत सर्वांनाच एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला आहे. असे असले तरी अजित पवार यांचा सल्ला कितपत मानला जातो हे येणार्या काळातच स्पष्ट होणार आहे.