परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टवादी पक्ष आहे. त्यांचे घड्याळ दहावरच अडकले असून त्यांनी लोकांचे बारा वाजवल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. ते आज परभणी लोकसभा निवडणुकीतील युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी घनसावंगी येथे बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे युवानेते आदित्या ठाकरे यांनीही आपल्या विरोधकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. परभणी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीतर्फे शिवसेनेचे संजय जाधव तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने राजेश विटेकर निवडणूक मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडीने आलमगीर खान अखिल मोहम्मद खान यांना उमेदवारी दिली आहे.
‘काँग्रेसची गाजरं खा आणि मतदान शिवसेनेला करा’
यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. कुणी गाजरं वाटली, तर गाजरं खायची आणि मतदान शिवसेनेला करायचं म्हणत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ते म्हणाले, ‘राहुल गांधी जिकडं पाहिलं तिकडं न्याय-न्याय करत फिरत आहेत आणि गाजरं वाटत आहेत. त्यामुळं तुम्ही गाजरं खायची आणि मतदान शिवसेनेला करायचं. कारण गाजराचा रंगही भगवाच असतो.’