मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आपले 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतवरले असून इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जातील, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होईल असं बोललं जात असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा खोडून काढत भाजप आणि शिवसेनेला याचा तोटा होणार असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, काँग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांना मैदानात उतरवून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय. नागपुरात नाना पटोलेंना पाठिंबा नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंविरोधात लढणार असल्याचं बोललं जातंय. सुशील कुमार शिंदे हे वंचित नसून ते सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आहे. शरद पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिलेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मावळमधून राष्ट्रवादीने शरद पवारांचे नातू पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. यावरुनही त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवार नातवांचं राजकारण करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे घराणेशाही चालवतात, पक्ष नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आघाडीवर निशाणा साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे यांची घराणेशाही स्पष्ट झाली असल्याचंही ते म्हणाले.
वाचा – वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर