मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resign reason) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar resign reason) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करुन राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह केला. राजीनामा योग्य फॉरमॅटमध्ये असल्याने तो मंजूर केल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
अजित पवार सध्या नॉट रिचेबल आहेत. अनेक जण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राजीनाम्यापूर्वी अजित पवारांनी एक ट्वीट केलं होतं, ज्यात त्यांनी शरद पवारांच्या ईडी चौकशीबद्दल भाष्य केलं होतं.
आज,मुंबईत आदरणीय @PawarSpeaks साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे.@NCPspeaks पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे मनापासून आभार!राजकीय हेवेदावे असले तरी,सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले.हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 27, 2019
शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जाणं रद्द केलं. मुंबईत आदरणीय पवार साहेबांना मोठ्या संख्येने मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील, याची खात्री आहे, असं ट्वीट अजित पवारांनी केलं होतं.
राजीनाम्याची माहिती पवारांनाही नाही
अजित पवारांनी राजीनामा दिल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झालाय. अजित पवार यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांना सहानुभूती मिळाली होती. त्यामुळे यावेळीही निवडणुकीच्या तोंडावर तोच प्रयत्न आहे का अशी चर्चा आहे.