मुंबई : सध्या एका मागोमाग एक शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला रवाना होत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते तिकडे जात आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा पाठिंबा वाढत आहे. अश्यात शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (Uddhav Thckeray) या आमदारांना तिकडे पाठवत आहेत का? असा सवाल चर्चिला जातोय. जनतेसह शिवसेनेच्या (Shivsena) मित्रपक्षांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
एवढे शिवसेनेचे आमदार एकत्रितपणे आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला कसे गेले, याची सध्या चर्चा आहे. सोशल मीडियावर याविषयी पोस्ट पाहायला मिळत आहेत. हे सगळं उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार होत असल्याचं बोललं जात आहे. त्यावर जयंत पाटलांनीही भाष्य केलंय. हे सगळं अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार फुटतील असं वाटत नव्हतं. पण जे घडलं ते घडलं. एकापाओठपाठ एक आमदार जात आहेत. ते कसं काय जात आहेत त्याचा अंदाज लागत नाहीये. पण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक जात असल्याने आश्चर्य वाटतंय. मग ते कशासाठी जात आहेत? एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत की त्यांचं आणि इतर आमदारांचं मन परिवर्तन करण्यासाठी जात आहेत की आणखी काही कारणाने याची कल्पना नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
मुख्मयंत्री वर्षावरुन मातोश्रीत परतले आहेत. यावरही जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आमच्या आग्रहासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षावर गेले होते. त्यांची मातोश्रीवरुन वर्षावर जाण्याची इच्छा पहिल्यापासूनच नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. कामासाठी सोयीचं जावं म्हणून ते वर्षावर गेले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये रोखठोक बोलले. यानंतर त्यांनी थेट वर्षा बंगला सोडत मातोश्रीवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. जाहीर केलेल्या निर्णयप्रमाणे ते रात्री उशिरा मातोश्रीवर परतलेही होते.