मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा एक व्हिडिओ सादर करत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने (BJP leader) त्यांच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) आरोप केला आहे. मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करतोय, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
ठाण्यातील वाय ब्रिजच्या उद्घाटन सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी स्वभावाप्रमाणे त्यांचा मार्ग काढला. उलट ते म्हणतायत, तुम्ही गर्दीत कशाला येताय? यात कुठलीही विनयभंगाची भावना किंवा कृती आहे, असं वाटत नाही. विशेषतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे याचे अर्थ लोकांना काय समजायचे, ते समजतात.
गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांच्यावर लक्ष केंद्रीत करून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मी त्यांना विनंती करणार आहे. पक्ष त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे.
आपण कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, सरकार येतात आणि जातात, कुणाचा किती विचार केला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनीही एक मर्यादा ठेवून काम करावं, अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी दिली आहे.
एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट असं राजकीय वातावरण ठाण्यात तापलं आहे. ठाण्यातील माजी महापौर नरेश म्हस्के गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हे षडयंत्र रचल्याचा आरोप आव्हाड गटातर्फे करण्यात येतोय.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकारी आरोप काय करतात, थेट ३५४ चा गुन्हा दाखल करतात, हे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्यांसाठी फार मोठा शॉक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. हा प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही. त्या महिलेने २४ तासानंतर तक्रार का केली? थेट विनयभंगाचा गुन्हा? एखाद्याला तुम्ही जीवनातून उठवायचं ठरवलंय का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय.