उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला कसा झाला आणि पोलीस काय करत होते? जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ दाखवत केली पोलखोल

| Updated on: Aug 11, 2024 | 9:55 AM

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर कशाप्रकारे हल्ला झाला आणि त्या हल्ल्यावेळी पोलिसांची भूमिका काय होती, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला कसा झाला आणि पोलीस काय करत होते? जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ दाखवत केली पोलखोल
Follow us on

Jitendra Awhad Reaction : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या विविध ठिकाणी सभा पार पडत आहेत. शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेवर आता विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी एक ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केले आहे. “काल घडलेला प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारा नाही. विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर कशाप्रकारे हल्ला झाला आणि त्या हल्ल्यावेळी पोलिसांची भूमिका काय होती, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. “खालील तीन व्हिडीओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही. विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही”, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी 10 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाची सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकला. दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले. ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच अशा प्रकारे काही तरी गोंधळ घातला जाऊ शकतो असा पोलिसांना संशय होता.