मुंबई : “तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?” असा उपरोधिक सवाल करत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारला इंधन दरवाढीबाबत त्याच्या 9 वर्ष जुन्या ट्वीटवरुन शालजोडे लगावले आहेत. (Jitendra Awhad takes a dig at Akshay Kumar)
“मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती.” असे ट्वीट अक्षयकुमारने 16 मे 2011 रोजी केले होते.
2011 मध्ये केंद्रात यूपीए-2 अर्थात काँग्रेसप्रणित मनमोहन सिंह सरकार होते, तर महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले असताना अक्षयकुमारने मौन साधल्याने जितेंद्र आव्हाडांनी त्याला डिवचले.
अक्षयचे 9 वर्ष जुने ट्वीट अक्षरशः खणून काढत जितेंद्र आव्हाडां ‘कोट-रीट्वीट’ केले आहे. “तू ट्विटरवर अॅक्टिव्ह नाहीस का? तू गाड्या वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड मोठी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे” असे ट्वीट करत आव्हाडांनी अक्षयकुमारला मेन्शनही केले आहे. आता अक्षय याला उत्तर देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
R u not active on @Twitter …
Have u stopped using cars..
Dnt u read news paper….@akshaykumar ….
There has been a steep #PetrolDieselPriceHike just for Ur information https://t.co/f5Dr1UPFhs— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2020
इंधनाच्या किमतीत सलग 19 व्या दिवशी दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा आजही भडका उडाला आहे. दिल्लीत तर पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. डिझेल 80.02 रुपये प्रतिलिटर, तर पेट्रोल 79.92 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेल 14 पैशांनी तर पेट्रोल 16 पैशांनी महाग झालं.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या दोन आठवड्यांपासून सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक पुरते त्रासून गेले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे 16 मार्च ते 5 मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.
(Jitendra Awhad takes a dig at Akshay Kumar)