आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठूनही लढू देत, मी रिंगणात उतरतो, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं चॅलेंज

| Updated on: Sep 29, 2019 | 12:02 PM

आदित्य ठाकरे महाराष्ट्रातून कुठूनही विधानसभा लढणार असतील, तरी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, असं राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे

आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठूनही लढू देत, मी रिंगणात उतरतो, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं चॅलेंज
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण (NCP leader Challenge Aditya Thackeray) यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. चव्हाण यांनी ट्वीट करुन खुलं आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असून वरळी मतदारसंघ जवळपास निश्चित मानला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरेंविरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं म्हटलं होतं. वरळी मतदारसंघातून काँग्रेस आपला उमेदवार देणार, की राष्ट्रवादी दंड थोपटणार, हे निश्चित नाही.

आदित्य ठाकरे महाराष्ट्रातून कुठूनही विधानसभा लढणार असतील, तरी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, असं सुरज चव्हाण (NCP leader Challenge Aditya Thackeray) यांनी म्हटलं आहे. दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अनेक युवा नेत्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली.

संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिलेच सदस्य असतील.

शिवसेना-भाजप युती जवळपास निश्चित मानली जात असली, तरी जागावाटपाचा फॉर्म्युल्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं म्हटलं जात आहे. पितृपक्ष संपण्याची वाट पाहणारे राजकीय पक्ष नवरात्रौत्सवाच्या आरंभानंतर युती, जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?