राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सकाळी भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीची वेळ न घेता भुजबळ ‘सिल्व्हर ओक’ येथे गेले होते. तब्बल दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर शरद पवार यांनी भेटीची वेळ दिली. या भेटीमुळे छगन भुजबळ पुन्हा स्वगुही परतणार का? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले. यासाठी प्रसंगी उद्धव ठाकरे, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारल्या. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे ही उपस्थित होते. अजितदादा यांच्यासोबत गप्पा सुरु असतानाच शरद पवार यांची भेट घेऊन भुजबळ यांचे येथे आगमन झाले. छगन भुजबळ यांनी या चर्चेत सहभागी होताना शरद पवार यांच्या भेटीची माहिती दिली.
मी ज्यावेळी साहेबांना (शरद पवार) यांना भेटायला गेलो त्यावेळी ते झोपले होते. त्यांची तब्येत बरी नव्हती. वेळीची भेट ठरविली नव्हती त्यामुळे मला काही वेळ वाट पहावी लागली. पण, काही झाले तरी त्यांची भेट घ्यायची होती. त्यामुळे तिथेच थांबून होतो. सुळे यांनी मला एका पुस्तक आणून दिले ते मी तिथे वाचत बसलो. दीड तासाने साहेब उठले आणि त्यानंतर आमची भेट झाली. या भेटीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबद्दल चर्चा झाली, असे भुजबळ यांनी सांगितले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा अनेक वर्ष प्रलंबित आहे. हा प्रश्न आताच सुटला नाही तर त्याचे परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतील. या प्रश्न सुटण्यासाठी ज्यांची ज्यांची भेट घ्यावी लागेल त्यांची भेट घेऊ असे त्यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी जरांगे पाटील यांची भेट घेणार का? असे विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, जे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत त्यांची भेट घेणार आहे असे उत्तर दिले.
दरम्यान, काही पत्रकारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहात का? असे विचारले असता ते म्हणाले, होय मी नाराज आहे. पण, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी नाराज आहे. त्यांच्याकडे प्रव्सासाठी मी एक विमान मागितले होते. परंतु, त्यांनी ते मला दिले नाही. ते ज्या खात्याचे मंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडे मी एक छोटी मागणी केली होती. ती त्यांनी पूर्ण केली नाही त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज आहे अशी मिश्कील कोटी त्यांनी केली.