मुंबई : दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवसेनेनंतर (Shiv sena) आता राष्ट्रवादी (NCP) फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचं म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभरातील प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी फोडण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील, तरी देखील त्यांच उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार का? या प्रश्नाला देखील मिश्किल उत्तर दिले आहे. भाजप काय मला विचारून मंत्र्यांची यादी ठरवत नाही. तसं झालं असतं तर मला आनंदच झाला असता असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. पकंजा मुंडे यांनी आधी देखील मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यामुळे त्या मंत्री म्हणून कसं काम करतील हे मला विचारण्याऐवजी त्यांनाच विचारलं पाहिजे असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
भाजप शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केला आहे. त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजप देशभारातील सर्वच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र राष्ट्रवादी संपवायला भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील तरी राष्ट्रवादी पक्ष संपणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.