बीड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बीड दौऱ्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी “माझ्या घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत” असा टोला लगावला. तर लोकसभेची जागा बीडमधून पुढील वेळेस राष्ट्रवादी निवडून आणणार, असा विश्वासही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवला.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
“मी काही जिल्ह्यामध्ये या परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटील यांच्यासोबत होतो. या परिवाराचे प्रमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपला पक्ष आपला परिवार हे पाहण्यासाठी हा परिवार दौरा आहे. आमच्या पक्षातील नेते परळीत आल्यावर स्वागत असंच होणार. या अगोदर अनेक कार्यक्रम घेतले, तोच विश्वास तोच प्रेम तुम्ही माझ्यावर टाकता, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे” असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
“पराभवाचा वचपा काढला”
“मी माझा राजकीय प्रवेश बघत होतो. 2012 मध्ये स्व. पंडित अण्णांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश केल्यानंतर रस्त्यावर जाणारे माझ्याशी नीट बोलत नव्हते. मी एखाद्या पिक्चरचा खलनायक आहे, असे झाले होते. माझ्या सहकाऱ्यांनी देखील शिव्या खाल्ल्या. आज अभिमानाने सांगावे वाटते, आम्ही बारामतीची बरोबरी करत नाही. आपण 35 वर्ष निवडून येता. आम्ही पराभवाचा वचपा काढला” असं धनंजय मुंडे म्हणाले.
“माझ्या घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत”
“33 पैकी 30 नगरसेवक राष्ट्रवादीचे परळीत निवडणून आणले. पंचायत समिती, सर्व स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे.
परळी मतदारसंघात आमची पकड मजबूत आहे. 2014 च्या निवडणुकीत पडेल उमेदावराला पवार साहेबांनी राज्याचं विरोधीपक्ष नेते पद दिलं, माझ्या घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत” असा टोलाही धनंजय मुंडेंनी लगावला.
“पुढच्या वेळी बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला”
“अनेक संकटांमध्ये माझा विश्वास तुटला नाही. मायबाप जनता माझ्या पाठीशी होती. इस्लामपूर, बारामती सारखी ताकद परळीत केलीय. आमच्यात क्षमता आहे, आम्हाला परळीचा विकास करायचा आहे. तीच आमची भूक आहे. सिकांदराबाद झोनमध्ये परळी सर्वश्रेष्ठ रेल्वे स्टेशन आहे, 400 कोटीचे उत्पन्न देते. लोकसभेची जागा बीडमधून पुढील वेळेस राष्ट्रवादी निवडून आणणार” असा विश्वासही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवला. बीडमधून सध्या भाजपच्या प्रीतम मुंडे सलग दुसऱ्यांदा लोकसभा खासदार असून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
शरद पवारांवर स्तुतिसुमने
“बजरंग सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवार माझ्या मतदार संघातील दिला गेला, मात्र नाथरा गावातून सर्वात जास्त लीड दिली. आज मला बोलयच नव्हतं, मनातून तुमचं स्वागत करायचं होतं” असं वक्तव्य त्यांनी जयंत पाटलांकडे पाहून केलं. “आपली बैठक बोलवली तरी मेळावा होतो, माझ्यावर विश्वास केलेलं नाते 25 ते 30 वर्ष पुढे न्यावे लागले, तेव्हा इस्लामपूर आणि बारामतीची बरोबरी करु. तीन पक्षाचा मेळ बसला, पवार साहेबांनी खरं करुन दाखवलं. मला आमदार केलं, मंत्री केलं, मंत्री होण्याआधीच आम्ही प्रचार केला, मंत्री होणार म्हणून” असंही धनंजय मुंडे म्हणाले.
“परळी आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला”
“ज्या पक्षांनी माझ्यावर विश्वास टाकला ती परळी आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला केला. माझ्यासमोर मोठी ताकद होती, वारसा होता. वैद्यनाथ कारखाना ताब्यात घेऊ शकतो मात्र आपल्याला तसं करायचं नाही. लढाई करूनच ताब्यात घेऊ. मला कोणी समुद्र मागितला तर तुमच्यासाठी मी नाही म्हणू शकत नाही” असंही ते जयंत पाटलांना म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ कारखान्याच्या उपाध्यक्षांसह 5 संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल
मंत्रिपद न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची नाराजी पुन्हा उघड, जयंत पाटलांच्या दौऱ्यात अनुपस्थिती