नागपूर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार म्हणनारे राज्यातील राजकारण बिघडवत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा मीच मुख्यमंत्री होणार असं त्यांना वाटत होतं, मात्र त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते सरकार अस्थिर करत असल्याची टीका खडसे यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हे भ्याडपणाचे लक्षण होते. पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागचे सुत्रधार देखील हेच असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष वारवांर महाविकास आघाडी सरकार आता पडणार असे चित्र निर्माण करत आहे. विरोधी पक्ष सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसला आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी पुन्हा येणार असे फडणवीस म्हणत होते. त्यांना वाटत होते की मला कोणाचेच आव्हान नाही, मात्र त्यांच्यासमोर शरद पवारांसारख्या तेल लावलेल्या पहिलवानाचे आव्हान होते. त्यांनी एका क्षणात राज्यातील सत्तेचं चित्र पालटलं. विरोधकांकडून कितीही वेळा महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. राज्यातील सरकार स्थिर असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करू नये असे खडसे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना खडसे यांनी म्हटले आहे की, विदर्भात शरद पवार यांना माणणारा मोठा वर्ग आहे. प्रयत्न केल्यास विदर्भात देखील राष्ट्रवादी नंबर वन पक्ष होऊ शकतो. मात्र त्यासाठी विदर्भातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत जी पोकळी आहे, ती सर्व प्रथम भरून काढावी लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सध्या निच पातळीचे राजकारण सुरू आहे. राजकारणाची ही पातळी मी कधी पाहिली नव्हती असे देखील खडसे यांनी यावेळी म्हटले आहे.