रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ठिय्या दिला. तीन तासांपेक्षा जास्त वेळ खडसे यांनी ठिय्या आंदोलन (Protest) करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतला. चेकपोस्टवर अवैधरीत्या टोलवसुली (Illegal Toll) सुरु असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. या टोलवसुलीविरोधात खडसेंनी ठिय्या आंदोलन करत थेट आव्हान दिलं. अवैध टोलवसुली प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही खडसेंनी यावेळी केला.
अनेकदा चेकपोस्टवरुन अवैध टोल वसुली केली जात असल्याचा आरोप केला जातो. मात्र ही टोलवसुली थांबवण्यासाठी नेमकी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे.अशातच आता राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी अवैध टोलवसुलीविरोधात आवाज उठवलाय.
एकनाथ खडसे यांनी चेकपोस्टवर जाऊन मंगळवारी ठिय्या आंदोलन केलं. जळगावमध्ये आपल्या मतदारसंघातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश चेकपोस्टवर त्यांनी आंदोलन केलं. यावेळी खडसे यांच्यासोबत त्यांच्ये काही कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.
टोल नाक्यावरील पोलिसांना एकनाथ खडसे यांनी जाब विचारला. कुणाच्या आशीर्वादाने ही टोल वसुली सुरु आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तीन तासापेक्षा जास्त वेळ खडसेंनी चेकपोस्टवर ठिय्या दिला. यावेळी चेकपोस्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या आरटीओ बेरीअरवर ते थांबले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ओव्हरलोड ट्रक असेल तर 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत रक्कम पोलीस घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होता.
या चेकपोस्टवरील वजनकाटे कामच करत नसल्याचं निदर्शनास आल्याचंही खडसेंनी म्हटलंय. वरच्या वर रक्कम घेऊन अवैध पद्धतीने पैसा घेतला जात आहे, असा आरोप खडसे यांनी केलाय. दोनशे रुपयांपासून दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत पैसे ट्रक चालकांकडून घेतले जात असल्याचं दिसून येतेय.
दरम्यान, खडसे येणार चेकपोस्टवर येत असल्याचं कळताच जमा केलेल्या पेसै घेऊन एका पंटरने पळ काळला, असा आरोप खडसे यांनी केला. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मदतीने या पंटरने पळ काढल्याचं खडसेंनी म्हटलं. याप्रकरणी पोलीस तक्रार नोंदवून एन्टी करप्शनने कारवाई करावी, अशी मागणी खडसेंनी केलीय.