मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लागलेली गळती थांबता थांबत नाहीये. नवी मुंबईतील (Navi Mumbai) दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. येत्या नऊ सप्टेंबरला नाईक यांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. नगरसेवकांच्या गटासोबत गणेश नाईक पक्षांतर करतील.
विधानसभेच्या तोंडावर राज्याच्या विविध भागातील नेते भाजपवासी होताना दिसत आहेत. त्यातच आता नवी मुंबईतही राष्ट्रवादीचं स्थान डगमगताना दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेतील 57 नगरसेवक, आमदार आणि पुत्र संदीप नाईक यांच्यासह गणेश नाईक भाजपप्रवेश करतील. यासोबतच नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ताही येणार आहे. कारण नवी मुंबईत भाजपचे फक्त 6 नगरसेवक आहेत.
बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावरुन नाराज होत्या, मात्र मंदा म्हात्रे यांचं स्थान अबाधित राहिल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली.
गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा
गणेश नाईक हा राष्ट्रवादीचा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.
2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या काळात गणेश नाईक यांनी अनेक महत्त्वाची पदं सांभळली. ते ठाण्याचे पालकमंत्री होते. तसेच, ते कामगार, उत्पादन शुल्क आणि पर्यावरण मंत्रीही होते. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक हे सध्या नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार आहेत.