मुंबई : सचिन वाझे प्रकरणी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारकडून गृहमंत्री बदलण्याचा किंवा मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. पण असा कुठलाही निर्णय किंवा चर्चा सुरु नसल्याचं जलसंपदामंत्री आमि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दिवसभरातील महत्वाच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.(Jayant Patil says NCP has no plans to change the Home Minister)
पूजा चव्हाण ते सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख कमी पडले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन हटवलं जाऊ शकतं, त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु असल्याचं आज दिवसभर बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठकही पार पडली होती. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.
राज्यातील विविध प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्रिमहोदयांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पार पडली.@PawarSpeaks #ReviewMeeting #NCP pic.twitter.com/QGvWop1dnx
— NCP (@NCPspeaks) March 15, 2021
गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत. राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाहेर याबाबत कितीही वावड्या उठत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. त्यामुळे गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच कायम राहतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीनंतर जो कोणी दोषी आढळेल त्याला योग्य ते प्रायश्चित घ्यावं लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत नाही. गृहमंत्र्यांनी त्यांना मिळेल तशी माहिती माहिती सभागृहात दिली आहे. गृहमंत्र्यांनी सभागृहात मांडलेली भूमिका ही त्या त्या वेळी योग्य होती. या प्रकरणात कुठल्या अधिकाऱ्याच्या सहभाग असेल तर तपास यंत्रणेनं याबाबत निष्कर्ष काढल्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही देशमुख यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री आणि पवारांच्या बैठकीनंतर संध्याकाळच्या सुमारास शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सभागृहात वेगळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांच्या कामांचा आढावा आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Jayant Patil says NCP has no plans to change the Home Minister