ठाणे: एसी लोकलमुळे वारंवार होणाऱ्या लोकलच्या खोळंब्यामुळे आज कळव्यातील रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाला. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रेल्वे (railway) प्रशासनाला सज्जड दम भरला आहे. एसी लोकलमुळे (AC Local) कळवा-मुंब्र्यातील एक ते दीड लाख प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या काळात एसी लोकलमधून फिरणं शक्य नाही. त्यामुळे रेल्वेने तात्काळ वेळीच पावलं उचलावीत. नाही तर आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसू. मला गोळ्या घातल्या तरी मी मागे पुढे पाहणार नाही. पण रेल्वे प्रवाशांच्या पाठी ठामपणे उभा राहीन, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला. कळवा आणि मुंब्रा परिसरात तिसरा आणि चौथा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी एकही गाडी उभी राहत नाही. ते प्लॅटफॉर्म कशाला बांधले? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन रेल्वेच्या खोळंब्यावरून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. सकाळी कळव्यात आंदोलनाची परिस्थिती झाली होती. त्यावेळी मी आंदोलकांना सांगितलं आंदोलन करू नका. याबाबत रेल्वे प्रशासनाशी बोलू. पण लोकांची गर्दी पाहता आणि आता माझ्या ऑफिसला असलेली गर्दी पाहता पुढे काय होईल याचं हे द्योतक आहे. साध्या लोकल टेन कमी केल्या. एसी ट्रेन सुरू केल्या. एसीचं रिटर्न तिकीट 200 रुपये आहे. तर साध्या लोकलचा महिन्याभराचा पास 215 ला मिळतो. महागाईत एसी लोकलचा प्रवास कुणाला परवडणार आहे? कळवा-मुंब्रा दरम्यान चार पाच प्लॅटफॉर्म बांधले. एक ट्रेनही थांबत नाही. मग बांधले कशाला?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
लोकांचा उद्रेक होतोय. न सांगता, न बोलवता सुद्धा लोक आंदोलनात उतरत आहेत. हे गांभीर्याने घ्या. मी कालच सांगितले हा टाईम बॉम्ब आहे. मुंबईचे जीवनमान रेल्वेवर चालते हे विसरू नका. @GM_CRly @Central_Railway #kalwa #mumbra pic.twitter.com/SmQFqMFTus
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 22, 2022
एक ते दीड लाख लोक रोज कळव्यातून प्रवास करतात ही छोटी गोष्ट नाही. ही छोटी लोकसंख्या नाही. एक लाख काय, 50 हजार लोकंही नाराज असेल तर परवडणार नाही. रेल्वेने तोडगा काढायला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून शांत असलेले कळवावासिय संतप्त का झाले? याचा विचार करा. गेल्या दोन महिन्यात 170 जणांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला. याला रेल्वे जबाबदार आहे. मृत्यूचा खेळ खेळू नका. आम्हाला मान्य नाही. आम्ही शांतपणे आंदोलन केलं आहे. आम्ही डीआरएमला भेटू. येत्या रविवारी आम्ही एकत्र भेटणार आहोत. आम्ही अगावू सूचना देत आहोत. आमच्या रोजी रोटीचा सवाल आहे. आम्हाला रोज दांड्या मारून चालणार नाही. मी रेल्वे प्रवाशांसोबत आहे, असंही ते म्हणाले.
पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वेच्या सर्वच स्टेशनवरील परिस्थिती अत्यंत बिकट व वेदनादायी आहे. याबाबत कुठलाही विचार पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे करताना दिसत नाही. कधितरी याचा स्फोट होईल हे मी लक्षात आणून देतोय. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच या खात्याच्या मंत्री महोदयांनी याकडे त्वरीत लक्ष द्यावे. कारण, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ही मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याची लाईफलाईन आहे. तेव्हा हा इशारा समजा किंवा सूचना समजा. पण, व्यवस्था सुधरायला हवी. नाहीतर फक्त वात पेटवण्याची गरज आहे. बॉम्ब तयार झाला आहे. आणि परवाच त्याचे दर्शन कळव्यात घडलेले आहे, असं सांगतानाच लोकांचा उद्रेक होतोय. न सांगता, न बोलवता सुद्धा लोक आंदोलनात उतरत आहेत. हे गांभीर्याने घ्या. मी कालच सांगितले हा टाईम बॉम्ब आहे. मुंबईचे जीवनमान रेल्वेवर चालते हे विसरू नका, असा इशाराही त्यांनी दिला.