ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मादान केले. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आव्हाडांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जणू कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदानाचा संकल्प सोडला. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज (5 ऑगस्ट) वयाची 55 वर्षे पूर्ण केली. (NCP Minister Jitendra Awhad donates plasma)
ठाण्यातील ‘ब्लड लाईन’ रक्तपेढीमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मादान केले. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. परांजपे यांनीही काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच व्यक्तींनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन यावेळी आव्हाड यांनी केले.
वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये, त्याऐवजी कोव्हिड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबवले.
जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली. कोरोनाशी लढताना जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, मात्र त्यांनी निकराने झुंज दिली. (NCP Minister Jitendra Awhad donates plasma)
हेही वाचा : श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही : जितेंद्र आव्हाड
आयसीएमआरच्या संशोधनामध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा उपचारासाठी लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले.
‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी 12 एप्रिलला ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यानंतर काही दिवसांनी ‘कोरोना’ची लागण झाल्याचं आव्हाड यांना समजलं होतं. तर ‘कोरोना’शी यशस्वी झुंज देत सुखरुप घरी जात असल्याचे ट्वीट आव्हाडांनी 10 मे रोजी केले होते. आपल्या प्रकृतीविषयी ट्विटरवरुन माहिती देत उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचे आभार त्यांनी व्यक्त केले होते.
गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांचे वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान.. https://t.co/4JQxzw2HcI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 5, 2020