मुंबई : कांग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सत्र न्यायालयात साक्ष घेण्यात आली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी प्रतिक्रिया अण्णांनी मीडियाशी बोलताना दिली. शिवाय आपल्या तक्रारीची कुणी दखलही घेतली नाही, असंही ते म्हणाले.
जीवे मारण्यासाठी पद्मसिंह पाटलांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती. याबद्दलची तक्रार मी देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही. या मागचं कारण म्हणजे पद्मसिंह पाटील हे तात्कालीन मुख्यमंत्री शदर पवारांचे नातेवाईक आहेत, असा आरोपही अण्णांनी केला.
पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे नातेवाईक असल्यामुळे कोणत्याही तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या करण्यासाठी पद्मसिंह पाटलांनी हत्या करणाऱ्या आरोपींना 30 लाखांची सुपारी दिली होती, असा आरोप आहे. याच प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे.
पवनराजे हत्याकांड प्रकरण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी बोलविण्यासाठी सीबीआयने कोर्टात अर्ज केला होता. मात्र या हत्याकांडातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी, अण्णा हजारे यांची साक्ष आवश्यक नसून कोर्टासमोर त्यांना बोलवून साक्ष घेऊ नये असा अर्ज करीत सीबीआयच्या भूमिकेला विरोध केला होता. डॉ पाटील यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अण्णा हजारे यांची साक्ष होणार आहे .
3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पवनराजे हत्याकांडात माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 8 जण संशयित आरोपी आहेत.
आरोपी पारसमल जैनने पवनराजे यांच्या हत्येबरोबरच अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ पद्मसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे यांच्या मार्फत दिली होती, मात्र आपण ती नाकारली असे कबूल केले होते.
कोर्टातील या खळबळजनक खुलाशानंतर अण्णा हजारे यांनी डॉ पाटील यांच्याविरोधात लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2009 रोजी हत्येचा कट आणि सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद केला, त्याचा तपास सुरू आहे. अण्णा हजारे यांच्या हत्येच्या सुपारीमुळे त्यांची या हत्याकांडात साक्ष महत्वाची मानली जाते.