सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला खिंडार पडणं सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यात आमदार दिलीप सोपल यांच्यानंतर आणखी एका नेत्याने पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. माजी मंत्री आणि करमाळ्याचे दिवंगत आमदार दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल (NCP Rashmi Bagal) यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे. त्या (NCP Rashmi Bagal) लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीत कामाची कदर नाही, असा आरोप रश्मी बागल यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करुनही त्याची कदर केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही बोलावला आहे. सोमवारी होणाऱ्या या मेळाव्यानंतर त्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करु शकतात.
कोण आहेत रश्मी बागल?
दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री श्यामल बागल यांना राष्ट्रवादीने 2009 मध्ये आमदार केलं.
दिगंबरराव बागल यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केलं होतं.
करमाळा विधानसभेला 2009 मध्ये माढा तालुक्यातील 36 गावे जोडली आणि या गावांनी उत्तम साथ दिली.
राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. पण अवघ्या 253 मतांनी त्यांचा पराभव झाला.
सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली.
सध्या रश्मी बागल यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाने आणि करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समिती आहे. दिंगबरराव बागल यांची राजकीय वारस म्हणून त्या राजकारणात वावरत आहेत. रश्मी बागल या करमाळामधील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यांवर त्यांची सत्ता आहे.
शरद पवारांच्या पुढाकाराने विवाह
बागल कुटुंब कायमच राष्ट्रवादीशी जोडलेलं आहे. करमाळा हे रश्मी बागल यांचं माहेर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सासवड येथील साखर महासंघाचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव ऊद्योगपती गौरव कोलते यांच्याशी त्यांचा विवाह झाला. माहेरातच त्यांनी राजकारणात स्थिरावण्याचा सातत्याने प्रयत्न केला. माहेरच्यांनी देखील पदरात घेतले खरे, पण पक्षाने दखल घेतली नाही ही नेहमी खंत राहिली. करमाळ्यात पक्षापेक्षा गटाला नेहमीच महत्त्व जास्त दिलं जातं आणि आता बागल गट शिवसेनेत गेल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे, तर आमदार नारायण पाटील यांची धाकधूक वाढली आहे.