मुंबई: एरवी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या निर्णयांमधील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मंगळवारी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. राज्यसभेत मंगळवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा निरोप समारंभ पार पडला. गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना मोदी भावूक झालेले दिसले. (NCP leader Rohit Pawar tweet about PM Narendra Modi)
रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या या कृतीचे ट्विटरवरुन जाहीरपणे कौतुक केले. राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झालेले पाहायला मिळाले. पक्षीय मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेल्या मार्गावरुन मोदींजींना चालताना पाहून आनंद वाटला, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यसभेत विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल बोलताना पंतप्रधान @narendramodi साहेब भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ‘पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत’, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेला मार्गावरून मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला. pic.twitter.com/BNkv6SWmnj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 9, 2021
राज्यसभेत आज जम्मू आणि काश्मीरच्या चार खासदारांना निरोप देण्यात आला. यात काँग्रेसचे राज्यसभेतले नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी चारही खासदारांबद्दल गौरवोदगार काढले. पण गुलाम नबी आझाद यांंचा गौरव करताना मात्र मोदी एवढे भावनावश झाले की एक वेळेस त्यांचा आवाज येणं बंद झालं. सभागृहात त्यावेळेस प्रचंड शांतता पसरली. मोदींची अशी अवस्था एक दोन मिनिटे नाही तर जवळपास पाच मिनिटं होती. मोदी आझादांबद्दल बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जवळपास तीन वेळेस मोदींनी अश्रू पुसले. दोन वेळेस पाणी घेत स्वत:ला सावरण्याचाही मोदींनी प्रयत्न केला. पण काँग्रेस नेत्याबद्दल बोलताना मोदींचे अश्रू थांबले नाहीत.
आझाद यांचं काम कसं आहे याचं उदाहरण मोदींनी दिलं. ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि आझाद हे जम्मू आणि काश्मिरचे. त्यावेळेस काश्मीरमध्ये गुजराती पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या घटनेनंतर आझादांनी मला फोन केला त्यावेळेस आझाद फोनवरच रडत होते. स्वत:च्या घरातला माणूस गेल्यासारखं त्यांची अवस्था होती. ते मृतदेह आणि नातेवाईकांना परत गुजरातला आणण्यासाठी रात्री एअरपोर्टवर राहिले. सकाळीही त्यांनी मला फोन केला. सगळे व्यवस्थित पोहोचले का म्हणून विचारलं. या सगळ्या प्रसंगात आझाद एखाद्या कुटुंबातल्या सदस्यासारखे वागल्याचं मोदी म्हणाले. हा पूर्ण प्रसंग सांगतानाच मोदी भावनावश झाले.
(NCP leader Rohit Pawar tweet about PM Narendra Modi)