नांदेड: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याचे संपूर्ण राज्यात संतप्त पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तार यांचे पुतळे जाळले. त्यांच्या घरावर दगडफेकही केली. अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. मात्र हा सर्व गदारोळ सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रावादीचे नेते अजित पवार हे कुठेच दिसले नाही. त्यांनी सत्तार यांच्या विधानाचा साधा निषेधही नोंदवला नाही. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या असतानाच सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची पाठराखण केली आहे.
सुप्रिया सुळे या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नांदेड येथे आल्या आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे उत्तर दिलं. अजितदादा वैयक्तिक सुट्टी वर आहेत. त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली तर चर्चा होते. हा माझ्या भावावर अन्याय आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी राऊतांशी भेट झाली नाही. पण सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. राऊत यांना जसा न्याय मिळाला. तसा अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माझा न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे. कालची ऑर्डर आली. त्याचे मी अभिनंदन करोत. एक सहकारी इतका संघर्ष करून तुरुंगातून आला आहे. त्याची आई, मुलं आणि कुटुंबीयांना सर्वांनाच त्रास झाला. पण अशावेळी कुटुंबाचा कुणी विचार करत नाही. आता कुणावर अन्याय करू नका. सत्ता येते आणि जात असते. ही वैचारिक लढाई आहे. ती त्याच पातळीवर लढली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
कोणतीही यात्रा कधीच कुणाच्या विरोधात नसते. आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उद्देश या यात्रेचा आहे, असं त्या म्हणाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नातं आहे. मी आणि राहुल गांधी संसदेत एकत्र बेंचवर बसतो, असंही त्यांनी सांगितलं.
काळा पैसा जावा म्हणून नोटाबंदी करण्यात आली. पण आता सध्या कॅश जास्त उपलब्ध आहे. नोटाबंदी झाल्यावर एवढ्या नोटा आल्याच कशा?, असा सवाल करतानाच रोजगाराचा प्रश्न आहे. महागाई वाढली आहे. समाज म्हणून त्यावर चर्चा केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.