मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिकांपाठोपाठ राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकित कंबोज यांनी वर्कवलं. त्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्याकडे वळवला. विद्याताई जय श्रीराम, असं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं त्याला आता विद्या चव्हाण यांनी जश्यास तसं उत्तर दिलं आहे. शिवाय त्यांनी निवडणुकीदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) एका फोनमुळे कंबोज यांची कशी सुटका झाली ते त्यांनी सांगितलं आहे. कंबोज माझ्या परिचयाचे नाहीत, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.
“भाजपचे बरेचसे नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मोहित कंबोज कोण त्यांना मी ओळखत नाही. ते माझ्या परिचयाचे नाहीत. एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते. पण तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की हे मोहित कंबोज आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत. फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा किस्सा विद्या चव्हाण यांनी सांगितला.
“मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय.
कंबोज कधी अजित दादांवर बोलतात तर कधी रोहित पवारांवर बोलतात. त्यांना बोलायचं ते बोलू द्या. आम्ही त्यांना उत्तरं द्यायला आम्ही सक्षम आहोत, असंही त्या म्हणाल्या आहेत.