पुणे : राष्ट्रवादीतून सुरु असलेले अनेक नेत्यांचे पक्षांतर त्यांच्या चौकशा सुरू झाल्याने होत आहे. या नेत्यांनी तिहारऐवजी भाजपमधील जेल स्वीकारल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांचे सत्ताधारी भाजपमध्ये होत असलेलं पक्षांतर म्हणजे ब्लॅकमेलिंगचं राजकारण असल्याचाही आरोप केला. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीने लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित ही भाजपची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिल्याशिवाय पुढील बोलणी होणार नसल्याचेही स्पष्ट केले.
‘पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण’
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. काँग्रेसने या आधी तसंच केलं होतं. आता भाजपकडून तेच चालू आहे. परंतु मी पक्ष फोडणार नाही. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कोणालाही पक्षात देखील घेणार नाही.”
‘राज ठाकरेंचं ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा’
राज ठाकरेंचं ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. ईव्हीएमवरील आक्षेपांबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. राज ठाकरे तसं न करता केवळ आंदोलन करणार असतील तर तो पळपुटेपणा ठरेल, असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं. तसेच ईव्हीएमबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
आंबडेकरांनी भाजप-शिवसेनेमधील मुख्यमंत्रीपदाच्या वादावरही भाष्य केलं. भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. शिवेसेनेकडून बाण सुटला आहे. आता भाजप शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते यावरच सर्व अवलंबून असल्याचंही प्रकाश आंबडेकर यांनी सांगितलं.