नागपूर : महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन आता हिवाळी अधिवेशनही सुरु झालं. मात्र, आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच आपला मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत (Ministry expansion of NCP). राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः हिवाळी अधिवेशनानंतर 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं म्हटलं आहे (Ministry expansion of NCP).
आज (17 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीविषयी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, “शरद पवार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. यावेळी ते त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करतील. हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. त्यातच हिवाळी अधिवेशन झाल्यावर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय झाल्याचा निर्णय झाला. काँग्रसच्या गोटातून मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुणाचीही वाट न पाहता पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.
महाविकासआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 मंत्री आहेत. नुकताच या मंत्र्यांचं खातेवाटपही झालं. यात एकाच मंत्र्याकडे अनेक मंत्रालयांचा कार्यभार आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करुन ही खाती विविध मंत्र्यांकडे दिली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.